रत्नागिरी : प्रतिनिधी
हवामान, माती यांच्या साधर्म्यामुळे गुजरातच्या प्रसिद्ध ‘केशर’ आंब्याची यशस्वी लागवड रत्नागिरीत होत आहे. मार्चअखेरीस गुजरातहून वाशीला येणारा केशर या वर्षी रत्नागिरीतून फेब्रुवारीतच वाशीत गेला आहे. गणेशगुळेतील (ता. रत्नागिरी) बागायतदार सुनील लाड यांच्या बागेतील आठ पेट्या वाशीला पाठविण्यात आल्या आहेत. हापूसप्रमाणेच त्याला दर मिळाल्याचे समाधान बागायतदारांना आहे. शनिवारी केशर आंबा वाशी बाजारात दाखल झाला. या आंब्याचे मूळ गुजरात-जुनागड येथे आहे. वाशीतील संचालक संजय पानसरे यांनी एक हजार रोपे श्री. लाड यांना लागवडीसाठी दिली होती. किनारी भागातील जमिनीत याची लागवड होते. कोकणातील किनार्यांवर हवामान आणि परिस्थिती गुजरातप्रमाणे आहे. त्याचा फायदा केशर उत्पादनाला झाला. बागायतदारांनी पूरक अशी औषधे वापरल्यामुळे त्याचे उत्पादन लवकर आले. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे आंब्याला रंग चढला असून तो हापूसप्रमाणेच चवदार आहे. गेली चार वर्षे लाड यांच्या बागेतून केशर वाशीला जात आहे. गतवर्षी सुमारे सहाशे पेट्या गेल्या होत्या. या वर्षी दुप्पट उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांना आहे. हापूसमध्ये तयार होणारा साका केशरमध्ये नाही. ही जात रायवळ आंब्याच्या अंशापासून तयार झालेली असल्यामुळे त्यात रोगप्रतिकारक शक्ती हापूसपेक्षा अधिक आहे. त्यावर बदलत्या वातावरणाचा परिणाम कमी होतो. संवेदनशील म्हणून हापूसची गणना होत असल्याने केशर लागवडीचा पर्याय निर्माण होत आहे.