Breaking News

विवाह सोहळ्यांना दुष्काळाची बसतेय झळ

औरंगाबाद : प्रतिनिधी

लग्नातील बँड, वाजंत्री, थाटमाट, कपडे या हौसमौज, मानापमान सांभाळण्यासाठी किंवा प्रतिष्ठेपायी करण्यात येणार्‍या खर्चाला दुष्काळी परिस्थितीमुळे फाटा दिला जात आहे. आटोपशीर आणि मोजक्याच वर्‍हाडींच्या उपस्थितीत टिळा-साखरपुड्यातच लग्न उरकण्याकडे कल असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. मध्यंतरी काहीशी थांबलेली ‘झट मंगनी पट ब्याह’सारखी लग्नाची गेटकेन पद्धत पुन्हा अवतरली आहे. यथोचित पाहुणचार झाला नाही म्हणून किंवा इतर कारणांमुळे रुसव्याफुगव्यांचे लग्नकार्यातील किस्से ग्रामीण भागात तसे नवे नाहीत, पण यातलं फारसं काही आता ऐकायला मिळेनासे झाले. कारण परिस्थिती भीषण दुष्काळाची आहे. लग्नासारखा मोठा सोहळा करायचा आणि त्यासाठी भोजनासाठी आलेल्या पाहुणे मंडळींना पिण्याच्या पाण्याची सोय करायची तर अंगावर काटाच उभा राहील, अशी परिस्थिती आहे. टँकरने सांडालवंडायचे पाणी आणावे लागतेय, तर पिण्यासाठी जारचे शुद्ध पाणी लागते. 20 लीटरच्या पाण्याचा जार 20 रुपयांना जरी मिळत असला, तरी असे 25-50 जार लागतात. टँकर किंवा जारच्याच पाण्यासाठी दोन-पाच हजार रुपये मोजावे लागतात. शिवाय या वर्षी दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामही शेतकर्‍यांच्या हाती लागला नसल्याने पैसा तसा जवळ नाहीच. उपवर-वधूंचे वय पाहिले आणि ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेतली तर त्यांची लग्नं लवकरात लवकर उरकून टाकण्याशिवाय पर्याय नाही.  त्यामुळे मुला-मुलींच्या लग्नकार्यात थाटमाट करण्याचा विचार बाजूला ठेवला जात आहे. कर्ज काढण्यापेक्षा आहे त्या पैशातच किंवा उसनवारी करून लग्न उरकण्याकडे ग्रामीण भागातील जनतेचा कल दिसून येत आहे. एखादे स्थळ नजरेत भरले की देण्या-घेण्यावरची बोलाचाली करायची आणि जमलंच तर टिळा-साखरपुड्यातच लग्न उरकून घ्यायचे, असेच चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. -महिनाभरात आठ ते दहा लग्ने आटोपशीर औरंगाबाद तालुक्यातील गोलटगाव येथील व्यापारी गणेश साळुंके यांनी सांगितले की, महिनाभरात गावात आठ ते दहा लग्नं अगदीच छोटेखानी पद्धतीने उरकण्यात आली. दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या हाती पैसा नाही. मुला-मुलींचं लग्नाचं वयही पुढे जाऊ लागलंय. शेतीत काम नसल्यामुळे तरुणांसह शेतकरी नजीकच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कामाला जात आहेत.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply