मुंबई : प्रतिनिधी
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन ही मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने 1 ते 4 मार्च या कालावधीत व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना या ठिकाणी ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया, भारत पेट्रोलियम, महिंद्रा, मध्य रेल्वे, युनियन बँक, देना बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, मुंबई पोलीस, मुंबई बंदर, जे. जे. हॉस्पिटल, नाशिक आर्मी, बीईजीसह यजमान मुंबई महापालिका आदी मातब्बर व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत. महिला गटात शिवशक्ती, डॉ. शिरोडकर, अमरहिंद, महात्मा गांधी, संघर्ष क्लब, स्वराज्य स्पोर्ट्स, होतकरू मंडळ, शिवतेज मंडळ, बालचीन मंडळ, राजमाता जिजाऊ, सुवर्णयुग आदी संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेकरिता तीन मैदाने तयार करण्यात येत असून, सामने सायंकाळच्या सत्रात विद्युतझोतात खेळविण्यात येतील. यंदाच्या वर्षी या स्पर्धेत रोख रकमेच्या बक्षिसात भरघोस वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत दोन्ही विभागाकरिता समान रोख रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. पुरुष व महिला गटातील अंतिम विजयी संघांना महापौर चषक व एक लाख रुपये; तर उपविजेत्या संघांना चषक व 75 हजार रुपये प्रदान करण्यात येतील. दोन्ही गटातील उपांत्य उपविजयी संघांना प्रत्येकी चषक व 25 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येईल. शिवाय स्पर्धेत सर्वोत्तम ठरणार्या दोन्ही गटातील खेळाडूस प्रत्येकी रोख 10 हजार रुपये देण्यात येतील, तसेच दोन्ही गटांत स्पर्धेतील उत्कृष्ट पकड व चढाईच्या खेळाडूस प्रत्येकी सहा हजार रुपये देण्यात येतील. या स्पर्धेच्या निमित्ताने सहा लाख रुपयांच्या जवळपास रोख रकमेच्या बक्षिसांचे वाटप होईल.
स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व संघांची चार गटांत विभागणी करण्यात येणार असून, सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येईल. या स्पर्धेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.