Breaking News

अरुणास्त! माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जेटली यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी

(दि. 24) निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. एम्स रुग्णालयात दुपारी 12च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जेटली आजारी होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी

(दि. 25) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जेटली यांच्या खांद्यावर अर्थमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती, परंतु दुसर्‍या कार्यकाळात तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रिपद घेण्यास नकार दिला. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळविला होता.

यापूर्वी जेटलींना कर्करोगाचेही निदान झाले होते. त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जाऊन उपचार घेतले होते. तेथे जेटलींवर सर्जरी करण्यात आली, तसेच त्याआधी त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपणही करण्यात आले होते. दरम्यान, अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर परदेश दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेटलींच्या कुटुंबीयांचे फोनवरून सांत्वन केले. या वेळी जेटलींच्या कुटुंबीयांनी मोदींना तुम्ही दौरा अर्धवट सोडून येऊ नका, असे म्हटले  आहे.

देशाच्या राजकारणातील दिग्गज नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अरुण जेटली यांची उणीव कायम भासेल. त्यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाले असून, मी माझा सर्वांत जवळचा मित्र गमावला आहे.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणीबाणीविरुद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे.

-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

अरुण जेटली यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला असून, खूप दु:ख झाले. ते खरंच खूप चांगले होते. नेहमी इतरांना मदत करीत. 2006 साली जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा ते वेळात वेळ काढून माझ्या घरी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. -विराट कोहली, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply