पनवेल ः वार्ताहर
अरुंद रस्त्यांचे शहर असलेल्या पनवेल शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ट्रॅफिक वार्डन नेमण्याचा निर्णय पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकताच घेण्यात आला. त्यामुळे लवकरच पनवेल शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला वार्डन रस्त्यावर काम करणार आहेत. वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी 1 ऑक्टोबर 2018 रोजी वाहतूक कर्मचारी कमी असल्यामुळे महापालिकेने वार्डन नेमावेत, अशी शिफारस केली होती. यापूर्वीही वाहतूक विभागाने कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हा सल्ला दिला होता. आयुक्त गणेश देशमुख यांनी अखेर कोंडीतून पनवेलकरांची सुटका करण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण महासभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. सर्वानुमते या विषयाला मंजुरी देण्यात आली. महापालिका या वार्डनसाठी दरवर्षाला 36 लाख रुपये खर्च करणार आहे.
पनवेल शहरात होणारी कोंडी लक्षात घेऊन वार्डन नेमण्याचा निर्णयाला मान्यता देण्यात आली. गर्दीच्या वेळा लक्षात घेऊन ट्राफिक वार्डनची नियुक्ती करण्यात येईल. महापालिकेच्या या वार्डनला नागरिकांनीदेखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते