नवी दिल्ली : वृत्तसंस्था
घरच्या मैदानावर खेळणार्या दबंग दिल्लीने यू मुम्बावर सहज मात करत घरच्या मैदानावर सलग तिसर्या विजयाची नोंद केली. 40-24 च्या फरकाने सामन्यात बाजी मारत दबंग दिल्लीने गुणतालिकेत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. यू मुम्बाच्या चढाईपटूंनी केलेली निराशा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
पहिल्या सत्रात यू मुम्बाने आक्रमक सुरुवात करत सामन्यात आघाडी घेतली होती. अर्जुन देशवाल, अभिषेक सिंह यांनी काही चांगले गुण कमावले, मात्र यानंतर दिल्लीने लगेचच सामन्यात पुनरागमन केले. आपला आघाडीचा चढाईपटू नवीन कुमारच्या साथीने दिल्लीने यू मुम्बाच्या बचाव फळीला खिंडार पाडले. त्याला चंद्रन रणजित आणि अन्य खेळाडूंनी चांगली साथ दिली, मात्र दुसर्या बाजूने यू मुम्बानेही दिल्लीला सामन्यात मोठी आघाडी घेऊ दिली नाही. यामुळेच मध्यंतरापर्यंत दबंग दिल्लीचा संघ 14-11ने आघाडीवर होता.
दुसर्या सत्रात दिल्लीच्या खेळाडूंनी सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. यू मुम्बाच्या बचावपटूंना रणनीती आखत दिल्लीने आपल्या जाळ्यात ओढले. अनुभवी जोगिंदर नरवाल, रविंदर पेहल यांच्या जाळ्यात मुम्बाचे चढाईपटू सहज अडकत गेले. दुसर्या बाजूने नवीन आणि चंद्रन रणजीतने चढाया करत यू मुम्बावर दुहेरी दबाव आणला. या दबावापुढे यू मुम्बाचा संघ सावरूच शकला नाही. अखेरीस 40-24 च्या फरकाने सामन्यात बाजी मारत दिल्लीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. यू मुम्बा गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, आता प्रो कबड्डी लीगमध्ये चांगलेच रंग भरू लागले आहेत. एकापेक्षा एक सरसपणे प्रत्येक संघ कामगिरी करताना दिसत आहेत. चांगल्या खेळामुळे सामने जबरदस्त होताना दिसत आहेत. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढत आहे.