Breaking News

सुधागडात जुगार अड्ड्यावर धाड ; 57 जण ताब्यात, सव्वासहा लाखांचा ऐवज जप्त

पाली : प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या तोंडावर सुधागड तालुक्यातील वाफेघर या गावात जुगाराच्या अड्ड्यावर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ व पाली पोलिसांनी शुक्रवारी (दि. 30) पहाटे 4 वाजता धाड टाकली. या कारवाईत 57 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडील रोख रकमेसह सव्वासहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे व त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वडखळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित शिंदे व पाली निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या पथकाने वाफेघर येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या वेळी घरात तीन पत्ती डाव सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत एक लाख 75 हजारांची रोकड, एक मॅजिक वाहन व 10 मोटारसायकली (किंमत साडेचार लाख) जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम 4 व 5 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तृप्ती बोराटे करीत आहेत.

दरम्यान, सुधागड तालुक्यात अशाच प्रकारे जुगाराचे अनेक अड्डे राजरोसपणे सुरू असून, तो चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे केवळ एक कारवाई करून न थांबता पोलिसांनी इतरही जुगाराचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply