खोपोली : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सिलसिला सुरूच असून, खोपोलीतील काँग्रेसचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युअल, नगरसेविका जिनी सॅम्युअल, माजी नगरसेवक महादू जाधव, मधुकर दळवी, शहराध्यक्ष संतोष खुरपुडे यांच्यासह कार्यकर्ते 1 सप्टेंबर रोजी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार आहेत.
भाजपचे कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या उपस्थितीत बेबीशेठ सॅम्युअल यांनी शुक्रवारी (दि. 30) स्वतः ही घोषणा केली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम ठोंबरे, अश्विनी पाटील, सचिव शरद कदम, निवृत्ती पिंगळे, शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, रोहिदास पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष खुरपुडे, मधुकर दळवी, हेमंत नांदे, दिलीप पवार, दिलीप निंबाळकर आदी सोबत होते.
खोपोली नगर परिषदेत भाजपची सत्ता आणण्यासाठी, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा आमदार करण्यासाठी सर्व ताकद लावणार असून, भाजपचे पाच हजार नवीन सदस्य बनवणार असल्याचे सॅम्युअल यांनी या वेळी सांगितले.
कर्जत विधानसभा भाजप लढवणार -देवेंद्र साटम भाजपमध्ये इतर पक्षांमधून येणार्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून, युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला, तरी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघ हा 99 टक्के भाजपसाठी सुटण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भाजप कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी या वेळी सांगितले.