Breaking News

कोरोनाशी लढणे हेच आमचे लक्ष्य

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या परिस्थितीतही राजभवन आणि मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठका कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात आहेत की राजकीय खलबतांसाठी हे येत्या काळात स्पष्ट होईल. या परिस्थितीत कोरोना या विषयाला प्राधान्य असायला हवे. भाजपमध्ये सरकार अस्थिर करण्याची कुठलीही हालचाल सुरू नाही. कोरोनाशी लढा देणे हेच आमचे लक्ष्य आहे. राज्य सरकार त्यांच्याच कर्माने जाईल, मात्र एक गोष्ट नक्की आहे की या सरकारकडून काही गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत ज्याच्यामुळे मूळ विषयापासून लोकांचे लक्ष हटेल, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 26) केला. त्यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
महाराष्ट्रात काँग्रेस निर्णायक भूमिकेत नाही. त्यामुळे तिथे आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले असून, त्यांचे हे विधान जबाबदारी झटकणारे आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत असल्याने कोरोनाचे खापर शिवसेनेवर फोडण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे, मात्र काँग्रेसला जबाबदारी झटकून पळता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सरकारमधील घटक पक्ष साथ सोडून जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
या वेळी फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी आणि नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. राणेंचा स्वभाव सर्वांना माहीत आहे. ते आक्रमक नेते आहेत. त्यांना अन्याय सहन होत नाही. राज्यातील करोनाची भीषण परिस्थिती पाहून त्यांनी राष्ट्रपती राजवटीची थेट मागणी केली. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही आणि या परिस्थितीत सरकार अस्थिरही व्हायचे नाही. आमचा सर्व फोकस कोरोनावर आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
केंद्राकडून भरपूर मदत
‘कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करीत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला योग्य ती मदत केली जात नाही, असा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करीत आहेत. अशा रीतीने केंद्र सरकारविरोधात वातावरण तयार केले जात आहे, मात्र केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना वाटप केले जाते. महाराष्ट्राला यात जास्तच मिळते’, असे देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी म्हटले.
केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहे. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी दिला. शेतीसाठी नऊ हजार कोटी रुपये दिले. पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठा केला. 4592 कोटींचे अन्नधान्य दिले, अशी आकडेवारीच त्यांनी सादर केली.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply