रेवदंडा : प्रतिनिधी
मिठेखार येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असून, परिसरातील भाविक श्रध्दा व भक्तिभावाने दुर्गामातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत. साळाव येथील बिर्ला मंदिरपासून सुमारे एक किमी अंतरावर मिठेखार गाव वसले आहे. गावात प्रवेश करतानाच दुर्गामातेच्या मंदिराचा कळस नजरेस पडतो. गावाच्या उजव्या दिशेला दुर्गामातेचे भव्यदिव्य असे मंदिर आहे. सभामंडपात प्रवेश करताच मंदिराच्या गाभार्यातील दुर्गामातेची मूर्ती लक्ष्य वेधून घेते. या दुर्गामातेचे आकर्षक रूप पाहताच भक्तगण नतमस्तक होतात. मिठेखार येथील ग्रामस्थ मोहन ठाकूर हे वैष्णवदेवीचे भक्त. तीन वर्षांपूर्वी ते सुमारे 125 ग्रामस्थांसह वैष्णवदेवीचे दर्शन घेऊन परत येत असताना प्रवासात विघ्न निर्माण झाले. त्या वेळी त्यांनी वैष्णवदेवीचा धावा केला. तेव्हा सोबत असलेल्या तीन मुलींच्या अंगात देवीचा संचार झाला आणि विघ्न टळले. मिठेखारला आल्यावर त्यांनी आम्ही येथेच राहणार, असे सांगितले. तेव्हा मोहन ठाकूर आणि ग्रामस्थांनी पाच लाख रुपये तसेच लोकवर्गणी आणि शासकीय निधीच्या साहाय्याने देवीचे मंदिर उभारले, अशी माहिती ग्रामस्थ सांगतात. या मंदिरात दरवर्षी गावातील नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने देवीची प्रतिष्ठापना केली जाते. नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी मंदिरात दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तसेच विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रोज रात्री दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरासमोरील डोंगरांच्या कपारीतून उगवत्या सूर्याची कोवळी किरणे थेट दुर्गामातेच्या मुखावर पडतात. ते पाहण्यासाठी अनेक भाविक व परिसरातील ग्रामस्थ आवर्जून मंदिरात उपस्थित राहतात.