मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा अलिबाग येथील पीएनपी क्रीडा संकुलात झाली. यामध्ये 19 वर्षांखालील गटात पेण प्रायव्हेट हायस्कूल विरुद्ध श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यांच्यात अंतिम सामना चुरशीचा व रंगतदार झाला. पेण हायस्कूलने फक्त दोन गुणांनी हा सामना जिंकला.
या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नांदगाव हायस्कूलच्या कबड्डी संघाचा कर्णधार सुशील वाडकर याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे, तसेच उत्कृष्ट चढाईपटू म्हणूनही वाडकरची निवड करण्यात आली आहे.
नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सागर राऊत व दत्तात्रेय खुळपे यांनी विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष फैरोझ घलटे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.