खालापूर : प्रतिनिधी
निलंबित केलेल्या तीन कामगारांना कामावर घ्यावे, या व अन्य प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी खालापूर तालुक्यातील उंबरे औद्योगिक वसाहतीमधील कॉलेजंन्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 35कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र आज सातवा दिवस उलटून गेला तरीही कंपनी व्यवस्थापन किंवा संबंधीत शासकीय अधिकार्यांनी त्याची दखल न घेतल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. कॉलेजंस फार्मा कंपनीच्या कामगारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला दिले होते. मात्र त्याबाबत निर्णय घेण्यास कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याने कामगारांनी संघटना स्थापन केली. त्याचा राग येवून व्यवस्थापनाने तुकाराम चव्हाण, संदेश आईत आणि संदीप आईत यांना निलंबित केले. त्यांना कामावर घ्यावे व प्रलंबीत मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.