पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलच्या नाच गं घुमा संस्थेच्या वतीने ‘संतांची मांदियाळी’ हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातल्या नांदिवडे या गावात सादर करण्यात आला. संत निवृत्ती नाथांपासून संत रामदास आणि आतापर्यंतची संत परंपरा, त्यांचे कार्य, त्यांनी समाजाला दिलेले ज्ञान याचे विवेचन यामध्ये करण्यात आले होते. अभंग, भारूड, ओव्या, गवळण, दिंडी, विठ्ठल नामाचा गजर यांनी या कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली.
नांदिवडे या गावात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष्मीनारायणाचा उत्सव साजरा झाला. कोकणातील परंपरेनुसार नाटक, गायन इत्यादी दरवर्षी सादर केले जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षी नाच गं घुमा या संस्थेला कला सादर करण्याचा मान मिळाला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत तुकाराम यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणी राम-सीता यांच्या भूमिका साकारल्या होत्या. संतांनी दिलेले वचन, सांगितलेले ज्ञान आजच्या काळातही उपयोगी आहे. महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृती जपण्याचे कार्य यानिमित्ताने केले जाते. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन शरद दातार यांनी केले होते, तर संकल्पना, लेखन, संकलन व निवेदन नाच गं घुमाच्या अध्यक्ष सुनीता खरे यांनी केले. विशेष म्हणजे संतांच्या भूमिका सर्व महिला कलाकारांनी केल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper