खोपोली ः बातमीदार
खोपोलीत मंगळवारी (दि. 28) विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन कोरोना व लॉकडाऊनमध्ये सुरक्षेचे भान ठेवून आयोजित केलेल्या या शिबिरास 90 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लॉकडाऊनमध्ये रक्ताचा तुटवडा होत असल्याने निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन खोपोली-परळी-जांभूळपाडा लोहाना समाज, श्री विमलनाथ जैन संघ खोपोली, बाबूमामा जाधव सामाजिक प्रतिष्ठान, खोपोली, लायन्स क्लब ऑफ खोपोली, सहजसेवा फाऊंडेशन, खोपोली व पाऊलवाट मैत्रीची, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत लोहाना महाजन हॉल, खोपोली येथे समर्पण ब्लड बँक सॅनिटाइझ मोबाइल वॅनद्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास खोपोलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. या वेळी शासनाच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करून योग्य ते अंतर राखत रक्तदात्यांनी रक्तदान केले. खोपोली पोलिसांचे या कामी नियोजनबद्ध सहकार्य लाभले. समर्पण ब्लड स्टोरेज, खोपोली यांनी यासाठी विशेष सहकार्य केले.