खालापूर : प्रतिनिधी
द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा ते लोणावळा या आठ किलोमीटर अंतराच्या मिसिंग लिंक कामाचा शुभारंभ रविवारी (दि. 8) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. साडेसात हजार कोटी रुपये खर्चाचे हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प एमएसआरडीसीने केला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरण व सुधारणा कामाची पाहणी केली. या वेळी त्यांच्या हस्ते खालापुरातील आडोशी बोगदा ते लोणावळा येथील सिंहगड कॉलेज या आठ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक कामाचा शुभारंभ करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, एमएसआरडीसी जॉइंट एमडी अनिल गायकवाड, चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते. आठ किलोमीटर लांबीच्या या मिसिंग लिंक कामात दोन महाकाय बोगदे व आडोशी व गारमाळ या भागात दोन महाकाय पूल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे द्रुतगती महामार्ग प्रवासात अंतर व वेळेची बचत होणार असल्याची माहिती या वेळी एमएसआरडीसीकडून देण्यात आली.