खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहर व परिसरात डेंग्यूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात जवळपास 9 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यातील तीन रुग्ण पार्वती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, तीन रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत. तर अन्य रुग्ण शहरातील डोंगरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, या आजाराला कशा प्रकारे रोखले पाहिजे व काय खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रयत्नही सुरू झाले आहेत. डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी साधे उपाय महत्त्वाचे असल्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दिला आहे.
डेंग्यू लागण झालेले रुग्ण
पार्वती हॉस्पिटलमध्ये : सुनिल मासारे (वय 43, रा. शास्त्रीनगर), डॉ. अभिमन्यू चंदने (वय 45, रा. शीळफाटा), अर्चना सिन्हा (वय 55, रा. खोपोली), दिलीप चौधरी (रा. लोणावळा), कुरेश शेख (वय 29, शीळफाटा), विशाल रामचंद्र वाघमारे (वय 24, काजूवाडी), अनुजा रामदास हडप (वय 24, रा. मधूबन सोसायटी, काटरंग)
डोंगरे हॉस्पिटल : रुपेश गायकवाड (रा. कर्जत), दत्तात्रेय मोरे (रा. वरची खोपोली), राजन सावंत (रा. भिवपुरी)
डॉक्टरांचा सल्ला
डेंग्यूचे रुग्ण बरे करण्यासाठी सुरुवातीलाच साधे औषधे व उपचार घेवून आराम केल्याने चार ते पाच दिवसात हा आजार बरा होतो. या आजाराचे डास घरामध्ये शो-पीसमध्ये लावलेली झाडे यामध्ये जास्त आढळतात. त्यामुळे नियमित पाणी बदली केले पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.