Breaking News

‘ती’ मुलगी देहरादूनमध्ये सापडली

पनवेल : प्रतिनिधी

तळोजा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा आरोप करून बेपत्ता झालेली खारघरमधील अल्पवयीन मुलगी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाली होती. ती मुलगी आपल्या मित्राबरोबर देहरादून येथे सापडली असून तिच्या मित्रावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून कोर्टाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे. 

पीडित मुलीच्या वाढदिवसावेळी पुणे येथे कार्यरत असलेले उपमहानिरीक्षक मोरे हे तिच्या घरी वाढदिवस साजरा करायला आले असता त्यांनी तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता. तळोजा पोलीस ठाण्यात तिच्या तक्रारीवरून मोरे यांच्याविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलगी 6 जानेवारीला मध्यरात्री घरातून बेपत्ता झाली. तिने मोरे यांच्यामुळे आपल्याला मानसिक त्रास झाल्याने आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे तिच्या अपहरणाचा गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. नवी मुंबई परिमंडळ दोन उपायुक्तांच्या 10 अधिकारी व 100 पोलिसांच्या पथकाने सगळी रेल्वे लाईन आणि परिसर पिंजून काढला. त्याचवेळी खारघर पोलीस ठाण्यात एक युवक हरवला असल्याची तक्रार दाखल झाली होती. तांत्रिक तपास करता सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये ती घरापासून खारघर रेल्वे स्टेशन आणि कुर्ला रेल्वे स्टेशनवर दिसून आली. या वेळी तिच्यासोबत तिचा मित्रही दिसून आला. ती रेल्वेने अलाहाबादला गेली असल्याचे समजले. सोमवारी (दि. 13) सकाळी पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला देहरादून येथून ताब्यात घेऊन नवी मुंबईत आणण्यात आले. मुलगा सज्ञान असल्याने त्याच्यावर पोक्सो कलम 8प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबई परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे, खारघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार आणि तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply