पनवेल : वार्ताहर
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नुकतीच अमली पदार्थविरोधी पथक 2ची स्थापना केली असून, या पथकाची स्थापना होताच त्यांनी तालुक्यातील पापडीचा पाडा, कळंबोली व खांदेश्वर परिसरात कारवाई करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे.
सध्या काही महाविद्यालये व परिसरात मोठ्या प्रमाणात चरस, गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री काही व्यक्ती करीत असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अमली
पदार्थविरोधी पथक 2ची स्थापना केली. या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सतीश जाधव असून त्यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक खरोटे, खेडकर व 10 कर्मचारी असे हे पथक उभारण्यात आले. त्यांना नवी मुंबई परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांचे मार्गदर्शन आहे. त्यांनी नुकतेच पनवेलजवळील पापडीचा पाडा येथे छापा टाकून एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा हस्तगत केला आहे.
अशाच प्रकारे खास बातमीदाराकडून कळंबोली व खांदेश्वर परिसरात काही व्यक्ती गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत केला. या प्रकरणात एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. देशाची तरुण पिढी सशक्त बनावी या उद्देशाने हे पथक स्थापन करण्यात आले असून, स्थापन झाल्यापासून अवघ्या काही दिवसांतच त्यांनी तीन धडक कारवाया केल्या आहेत. याबाबत कोणाला
अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.