खोपोली : प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 9) खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात नगरपालिका शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी आदर्श समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
गणेशोत्सावानिमित्त सुटी असल्याने शिक्षक दिनाचा कार्यक्रम 5 सप्टेंबरऐवजी सोमवारी घेण्यात आला. नगरपालिकेच्या शिक्षण सभापती केविना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष वनिता कांबळी, शिवसेना गटनेते सुनील पाटील, शिक्षण विभाग समन्वयक समिती अध्यक्ष मनेश यादव, मागासवर्गीय कल्याण सभापती किशोर पानसरे, परिवहन सभापती मोहन औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेटे, शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी जयश्री धायगुडे, मुख्याध्यापक मोहन पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी जयश्री धायगुडे यांनी प्रास्ताविकात शिक्षक व शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून सत्कार सोहळ्याचे औचित्य विषद केले. मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी खोपोली नगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्याचे कौतुक केले व सर्वच शिक्षक हे आदर्श असल्याचे मत व्यक्त केले. समाजाभिमुख दृष्टिकोन व अभ्यासक्रमापलीकडची गुणवत्ता विकसित करण्याची गरज शिक्षण सभापती केविना गायकवाड यांनी व्यक्त केली.