पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल प्रभाग 17मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने शनिवारी(दि. 14) सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नवीन पनवेलमध्ये रेल्वेस्टेशन आणि पोस्ट ऑफिसजवळ रस्त्यावर पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. नवीन पनवेल रेल्वे स्टेशनसमोरील बीकानेर चौकात रस्ताच अस्तित्वात राहिला नव्हता. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांना वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत होते. या खड्ड्यामुळे गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च आणि डॉक्टरची बिलेही भरावी लागत होती. रस्त्यावरून चालणार्यांच्या अंगावर खड्यातील पाणी उडून कपडे खराब होत होते. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्याकडे याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यांनी याबाबत सिडकोला पत्र देऊन प्रभाग 17मधील खड्डे भरण्यासाठी पाठपुरावा केला. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकार्यांना नवीन पनवेलमधील खड्डे भरण्याचे आदेश दिले. त्यामुळे शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली. याबद्दल नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेविका वृषाली वाघमारे यांचे आभार मानले.