पनवेल : बातमीदार
पनवेलमधील सिडको वसाहतींमध्ये लवकरच सिग्नलयंत्रणा कार्यान्वित होणार आहे. सिग्नल बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, अवघ्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, तळोजा येथे हे सिग्नल बसविण्यात आले आहेत. सिडकोच्या नियोजनबद्ध वसाहतींमध्ये वाहनांची कोंडी होण्याचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढले आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत वाहनांची संख्यादेखील वाढत असल्यामुळे कळंबोली, खांदा कॉलनी या वसाहतींमध्ये सिग्नल यंत्रणेची गरज भासू लागली होती. सिडको प्रशासनाने सिग्नल यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सिडको प्रशासनाने नागरिक आणि वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार खांदा कॉलनीतील शिवाजी चौक, तळोजा येथील पनवेल-मुंब्रा मार्गावर सीआयएसएफ कॅम्प, कामोठ्यात पोलीस ठाण्यासमोरील मुख्य चौक, खारघरमधील हिरानंदानी चौकातील जंक्शन आणि कळंबोलीतील स्मृतिवन उद्यानाच्या समोरील चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. यासाठी सिडकोने एक कोटी चार लाख 22 हजार 598 रुपये इतका खर्च केला आहे. पाचही ठिकाणी सिग्नल बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, अवघ्या काही दिवसांत हे सिग्नल कार्यान्वित होणार आहेत, अशी माहिती सिडकोच्या विद्युत विभागाकडून देण्यात आली.