Breaking News

नवीन पनवेलची वाहतूक कोंडीतून सुटका

पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम नवीन पनवेल रेल्वेस्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी बिकानेर कॉर्नरला रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना रस्ते चांगले करण्याचे आणि महापालिकेतर्फे ट्रॅफिक वॉर्डन ठेवण्याचे आश्वासन दिल्याने आता वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.                 

महाराष्ट्र शासनाने मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी सिडकोची स्थापना करून नवी मुंबई शहर वसवले. त्यानंतर आणखी जागेची आवश्यकता वाटू लागल्याने सिडकोने पनवेल पूर्वेला वसाहत निर्माण केली. त्यावेळच्या सिडकोच्या अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या पनवेल आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाचा वेध व्यवस्थित घेतला नाही. नवीन पनवेल बाजूला त्या वेळी जागा स्वस्त असल्याने अनेकांनी तेथे जागा घेतल्या. रेल्वे स्टेशनवर येण्या-जाण्यासाठी दुचाकी खरेदी केल्या. त्या उभ्या करण्यासाठी वाहनतळ अपुरे असल्याने रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. रेल्वेस्टेशनजवळील रस्त्यावर वाहतूक वाढणार याचा अंदाज सिडकोला आला नाही.त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी ठेवली. आज तेथून नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला विचुंबे आणि उसर्लीकडे रस्ता जातो. डावीकडे एचडीएफसी सर्कलवरून खांदा कॉलनी, डी मार्ट, नेरे आणि आदईकडे, तर बिकानेर कॉर्नरवरून सरळ सुकापूर, नेरे येथे रस्ता जातो. या भागात मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्याने नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत गर्दी असते.

नवीन पनवेलमधील प्रवेशद्वारावर असलेल्या एचडीएफसी चौकात आणि आदई चौकात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे  नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. तत्कालीन वाहतूक शाखेचे निरीक्षक विजय कादबाने यांनी सिडकोने या चौकातील सर्कल लहान केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल म्हणून सिडकोकडे पत्रव्यवहार केल्यावर एचडीएफसी चौक व आदई चौकातील सर्कल कमी करण्यास सिडकोने मंजुरी देऊन 55 लाख रुपये खर्च करून दोन्ही चौकांतील सर्कल कमी करण्यात आले. 

 बिकानेर कॉर्नरला रस्त्याच्या कोणत्याही बाजूला रिक्षा उभ्या असतात. रिक्षा स्टँडसाठी दिलेल्या जागेवर असतात त्यापेक्षा जास्त रिक्षा आजूबाजूला उभ्या केलेल्या असतात. अबोली रिक्षांसाठी खास स्टँड देण्यात आला.त्या ठिकाणी काळी-पिवळी रिक्षाच उभ्या असतात. त्या सर्कलला रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाड्यांचा वेग कमी होतो. हा रस्ता पनवेल महापालिकेकडे हस्तांतर करावयाचा असल्यामुळे सिडको त्याकडे लक्ष देत नव्हती. आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आठ कोटी 23 लाख रुपये मंजूर केले. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी त्यांच्या हस्ते झाले. त्यामुळे हा रस्ता चांगला झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होईल.   

एचडीएफसी सर्कलच्या दिशेने जाणार्‍या बाजूला पूर्वी रिक्षा स्टँड नव्हता. आता काही दिवसांपासून त्या बाजूला सकाळ-संध्याकाळ रिक्षा उभ्या असतात. त्यांची रांग अभ्युदय

बँकेपर्यंत असते. त्या ठिकाणी असलेल्या गॅरेज व दुकानांसमोर उभ्या असलेल्या वाहनांची एक लाईन असते. त्याच्या बाजूने रिक्षाची लाईन असते. त्यातच या लाईनमध्ये उभी करण्यासाठी येणार्‍या रिक्षा वळवण्यासाठी जागा नसल्यामुळे  वाहतूक कोंडी होते. रेल्वे

स्टेशनमधून बाहेर पडल्यावर अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कट्ट्याजवळ  एनएमएमटी बसचा थांबा आहे. त्या ठिकाणीच विचुंबेकडे जाणार्‍या रिक्षांचा थांबा आहे. गाववाल्यांच्या दुचाकींची गर्दीही असते. त्यांना वाहतुकीच्या नियमांचे बंधन नसते. सेक्टर 15मध्ये रस्त्यावर दोन्ही बाजूला दुचाकी उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे चालायला जागाच नसते. 

बिकानेर कॉर्नरच्या सर्कलला सकाळ-संध्याकाळ वाहतूक पोलीस ठेवावा, अशी मागणी अनेक वर्षे केली जात आहे. वाहतूक शाखेकडून कर्मचारी कमी असल्याचे कारण देऊन दुर्लक्ष केले जात आहे. सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील रस्त्याच्या कामाच्या

भूमिपूजनप्रसंगी या ठिकाणी महापालिकेकडून संध्याकाळी ट्रॅफिक वॉर्डन ठेवण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे आता येथील वाहतुकीला शिस्त लागून वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. यामुळे नवीन पनवेलमधील नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका होईल, असे म्हणायला हरकत नाही.

-नितीन देशमुख

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply