देश पुनर्उभारणीच्या कामी त्यांनी दाखवलेली धडाडी अवघ्या देशाला स्तिमित करून गेली आहे. या माणसाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे याने तर सगळेच अचंबित होतात. परंतु मोदी तर अपेक्षित कर्तबगारीच्याही पुढे झपाट्याने कूच करीत निघाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी 69 वर्षांचे झाले. 2014 साली जनमताच्या एका प्रचंड लाटेवर स्वार होऊन ते देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले. एव्हाना ते पाच वर्षांहून अधिक काळ सत्तास्थानी आहेत, परंतु त्यांच्या अत्यंत प्रेरणादायी अशा व्यक्तिमत्वाची देशवासियांवर पडलेली छाप तिळमात्रही कमी झालेली नाही. उलट यंदाच्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांनी काही अतिशय महत्त्वाच्या विषयांवर ज्या धडाडीने निर्णय घेतले आहेत, त्यांच्या कार्यशैलीतून सातत्याने त्यांची क्षमता आणि देशाच्या कारभारावरची कमालीची पकड यांचे जे काही दर्शन घडते आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातल्याच नव्हे तर जगभरात विखुरलेल्या भारतीयांसाठी ते एक अखंड प्रेरणास्रोत ठरले आहेत. त्यामुळेच मंगळवारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना आढळून आला. परंतु स्वत: मोदी मात्र आपला वाढदिवस प्रतिवर्षी अतिशय साधेपणानेच साजरा करतात. ते कुणाकडूनही शुभेच्छांचा स्वीकार करीत नाहीत व नेहमीप्रमाणे काम करीतच आपला दिवस व्यतीत करतात. आपल्या मातोश्री हिराबेन यांची भेट मात्र ते यादिवशी सहसा चुकवित नाहीत व त्यांचे आशीर्वाद आवर्जून घेतात. मोदीजींनी आपले अवघे आयुष्य देशसेवेतच व्यतीत केलेले असल्यामुळे यंदा भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सप्ताहाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरे, नेत्रचिकित्सा आदी विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्वत: मोदीजी वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवारी रात्रीच गुजरातला रवाना झाले. मंगळवारी त्यांनी तेथील सरदार पटेल यांच्या अतिभव्य पुतळ्यास भेट दिली. गेल्या वर्षी त्यांच्याच हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. परंतु यंदा पुन्हा सरदार पटेल यांच्या पुतळ्यास भेट देण्यासारखे खास कारणही होतेच. एक भारत, श्रेष्ठ भारताचे स्वप्न सरदार पटेलांनी पाहिले होते. ते पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कलम 370 रद्दबातल ठरवून उचलले आहे. अर्थातच या घडामोडीचे औचित्य मोठे आहे. परराष्ट्र नीतीच्या क्षेत्रात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या व क्षमतेच्या मर्यादा उघडकीस येतील असा काहिसा अपप्रचार विरोधकांकडून, विशेषत: काँग्रेस पक्षाकडून प्रारंभी केला गेला होता. परंतु प्रत्यक्षात पंतप्रधानपदी आल्यापासूनच मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या तर्हेची छाप पाडली आहे, जागतिक स्तरावरील मोठमोठ्या नेत्यांशी त्यांनी ज्या सहजतेेने संवाद साधला आहे, की आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांनी स्वत:चे व पर्यायाने भारताचे निर्माण केलेले वैशिष्ट्यपूर्ण स्थान सगळ्यांनाच प्रभावित करून गेले आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची अस्मिता उंचावण्याचे काम करीत असतानाच त्यांनी देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाशी जोडले गेलेले आपले नातेही जपले आहेच. देशातल्या गोरगरीब जनतेचे भले जर कुणी करू शकतो तर ते मोदीच, हा विश्वास त्यांनी टिकवून ठेवला आहे. आबालवृद्धांसह सगळ्यांनाच अखंड प्रेरित करणार्या मोदीजींच्या पाठिशी अवघ्या देशाच्या शुभेच्छा अखंड आहेतच व राहतीलही.