पोलीस अधिकार्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
अलिबाग : प्रतिनिधी
सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात, राज्य गुप्तवार्ता विभागातील तीन पोलीस अधिकार्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात आत्महत्या केली होती. या प्रकरणी कणेरकर यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार अलिबाग पोलीस ठाण्यात राज्य गुप्त वार्ता विभागातील सहा पोलीस अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात आरोपी असलेल्या पोलीस अधिकारी विजय बनसोडे, रविंद्र साळवी, प्रशांत लांगी यांनी 9 सप्टेंबर रोजी अलिबाग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. एम. बुक्के यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. संतोष पवार यांनी काम पाहिले.