Thursday , March 23 2023
Breaking News

तिसर्या वन डेत इंग्लंडचा विजय

मुंबई : प्रतिनिधी

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने भारताच्या महिला संघाचा दोन विकेटने पराभव केला. तीन सामन्याची मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे.

पहिल्या दोन सामन्यात भारताने निर्वादित वर्चस्व गाजवले होते, मात्र अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करीत वन डे मालिकेचा शेवट गोड केला आहे. महाराष्ट्राच्या स्मृती मानधना आणि पूनम राऊत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर महिला संघाने इंग्लंडसमोर 205 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल खेळणार्‍या इंग्लंडने 49व्या षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजी करणार्‍या भारताने पहिल्याच षटकात सलामीची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज बाद झाली. त्यानंतर पूनम राऊत आणि स्मृती मानधना यांनी शतकी भागिदारी केली. मानधनाने 74 चेंडूंत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. राऊतने 97 चेंडूंत संयमी 56 धावांची खेळी केली. कर्णधार मिताली राज आपल्या लौकिकास खेळी करण्यात अपयशी ठरली. अखेरच्या काही षटकांमध्ये दिप्ती शर्माने 27; तर शिखा पांडेने केलेल्या 26 धावांमुळे भारताला 200 धावांचा टप्पा पार करता आला.

प्रत्युत्तरादाखल खेळणार्‍या इंग्लंडची सलामी जोडी झुलन गोस्वामीने फोडली. झुलनने 33 धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. इंग्लंडच्या डॅनिअल वॅटने अर्धशतक करून इंग्लंडला सावरले. शिखा पांडेने तिला तंबूत धाडून भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. त्यानंतर जॉर्जिया एल्वीसीसने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत सावध खेळ करून इंग्लंडला विजय मिळवून दिला.

यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची ट्वेन्टी-20 मालिका खेळविण्यात येणार आहे. यातील सर्व सामने गुवाहाटीला अनुक्रमे 4, 7 व 9 मार्चला होणार आहेत.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply