मुरूड : प्रतिनिधी
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) नवाब कालीन गारंबी धरणाची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेकडो श्रीसदस्यांनी श्रमदान केले.
मुरूड शहराला पाणीपुरवठा करणारे गारंबी धरण जंगल भागात आहे. संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात पाण्यासह डोंगरातील माती या धरणात येते. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचतो, तसेच जंगलातील झाडांचा पालापाचोळा पडत असतो. लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा आणि धरणात अधिकाधिक पाणी साठा व्हावा, यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत गारंबी धरणातील गाळ काढणे व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी सूर्योदयापूर्वी या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. त्यात सुमारे 800 श्रीसदस्य सहभागी झाले होते. त्यांनी धरणातील हजारो टन पालापाचोळा व गाळ काढला, तसेच मोठमोठे दगड बाजूला सारून पाण्याचा प्रवाह मोकळा केला. श्रीसदस्यांचे हजारो हात या कामासाठी लागल्याने सदरचे काम जलद गतीने पूर्ण झाले. नगराध्यक्षा स्नेहा पाटील, नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, बांधकाम सभापती अशोक धुमाळ, विजू पाटील, पांडुरंग आरेकर, युगा ठाकूर, मेघाली पाटील, गटनेत्या मुग्धा जोशी, वंदना खोत, अनुजा दांडेकर, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत आदींनीही या मोहिमेत भाग घेतला होता.
मुरूडकरांची भागणार तहान
गारंबी धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे नावाबकालापासून धरणातील पाणी ग्रॅव्हिटीने वाहून मुरूड शहरात येते, विजेचे पंप न वापरता पाणी घराघरात पोहचते. जांभा दगडातून वाहून आल्याने पाणी अतिशय शुद्ध आहे. ह्या पाण्याला शुद्धीकरणाची गरज भासत नाही इतके ते शुद्ध पाणी असते, मात्र परिसरात खारआंबोली धरण झाल्याने गेल्या काही वर्षांपासून गारंबी धरणाचा वापर कमी झाला आहे. मुरूडमधील नागरिकांना पिण्यासाठी गारंबी धरणातील पाणी मिळावे, यासाठी डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी या धरणातील गाळ काढण्याचे काम श्रीसदस्य करतात. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रास्ता स्वच्छता मोहीम, मोफत दाखले वाटप, विहिरी स्वच्छता मोहीम राबविली जाते, तसेच वृक्षलागवड, संगोपण व संरक्षण करण्याचे काम प्रतिष्ठानमार्फत केले जात आहे.