Breaking News

आयपीएलमुळे श्रीलंकन खेळाडूंचा पाकिस्तानला यायला नकार

कराची : वृत्तसंस्था

पाकिस्तान दौर्‍यातून श्रीलंकेच्या 10 प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने मात्र याबाबत भलताच दावा केला आहे. आयपीएलमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये यायला नकार दिला, असे आफ्रिदीने म्हटले आहे.

दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही श्रीलंकेच्या पाकिस्तान दौर्‍याला हिरवा कंदील देण्यात आला आहे. पाकिस्तान दौर्‍यात श्रीलंका तीन ट्वेन्टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे, मात्र या दौर्‍यातून श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी माघार घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आयपीएलमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये यायला नकार दिला, असा दावा केला. पाकिस्तानचा दौरा केलात, तर आयपीएलचा करार करणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोपही आफ्रिदीने केला आहे.

’आयपीएल टीमकडून श्रीलंकेवर दबाव आहे. याआधी पीएसएलवेळीही मी श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंशी बोललो होतो. त्यांना पीएसएलमध्ये खेळायचे होते, पण तुम्ही पाकिस्तानमध्ये गेलात, तर आयपीएलचा करार करणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले,’ असे एका व्हिडीओमध्ये आफ्रिदी म्हणाला आहे.

2009 साली पाकिस्तान दौर्‍यावर असलेल्या श्रीलंकेच्या टीमवर जीवघेणा दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी श्रीलंकन टीमच्या बसवर गोळीबार केल्याने सहा खेळाडू जखमी झाले होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply