भत्त्यांमध्ये बीसीसीआयकडून दुप्पट वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या आणि परदेश दौर्यावर सर्वोत्तम कामगिरी करीत आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौर्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे.
एका बातमीनुसार परदेश दौर्यावर असताना भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आता दरदिवशी 250 अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. (रुपयांमध्ये अंदाजे 17 हजार 799) याआधी भारतीय खेळाडूंना दरदिवसाला 125 अमेरिकन डॉलर भत्त्याच्या स्वरूपात मिळायचे. (रुपयांमध्ये अंदाजे 8 हजार 899) भारतीय संघाच्या परदेश दौर्यात विमानाने बिझनेस क्लासचा प्रवास, हॉटेलमधील राहणे आणि लाँड्री याचा खर्च बीसीसीआय करते. याव्यतिरिक्त खेळाडूंना 250 अमेरिकन डॉलर भत्त्याच्या स्वरूपात मिळणार आहेत.
विश्वचषकात पराभवाचा फटका बसल्यानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौर्यात दमदार पुनरागमन केले. ट्वेन्टी-20, वन डे आणि कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवत भारताने मालिका खिशात घातली. यानंतर भारत थेट 2020 साली जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौर्यावर जाणार आहे. त्याआधी भारताला सर्व सामने आपल्या घरच्या मैदानावर खेळायचे आहेत.