मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपच्या गोटात उत्साह आहे, तर दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या गळाला लागल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरुत्साह दिसून येतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभर दौरे करून ’बांधणी’ करत आहेत. मात्र, काँग्रेस अजूनही शांत आहे. यंदाची निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वर्चस्वाची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आहे.
तिहेरी तलाक आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर देशातील ही पहिली सर्वात मोठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कल जाणून घेण्याची संधी असेल. कारण या दोन्ही निर्णयांवर देशातील जनता खूश आहे, असा भाजपचा दावा आहे. महाराष्ट्रात भाजपच्या जागा वाढल्यावर हा दावा निश्चितच खरा ठरणार आहे.
राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे, तर विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपमध्ये सहभागी करून घेतले, तसेच ज्या नेत्यांना भाजपमध्ये सहभागी करून घेता आले नाही त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक घेतली, मात्र त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. आता मुख्यमंत्र्यांसमोर मागच्या निवडणुकीपेक्षा या वेळी अधिक जागा जिंकून आणण्याची संधी आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper