अलिबाग : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यामध्ये 22 लाख 65 हजार 478 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2014च्या तुलनेत जिल्ह्यात दोन लाख 89 हजार 206 मतदार वाढले आहेत, अशी महिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 22) येथे दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील निवडणूक तयारीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने हेही उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल, उरण असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2019पर्यंत 11 लाख 52 हजार 911 पुरुष मतदार, 11 लाख 12 हजार 563 महिला मतदार, तर 4 इतर अशा एकूण 22 लाख 65 हजार 478 मतदारांची नोंदणी झाली आहे. सन 2014च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत 2 लाख 89 हजार 206 इतकी वाढ झाली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 955 महिला असे प्रमाण आहे. त्या तुलनेत 2014 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे 954 इतके होते, तर 2019मध्ये या प्रमाणात 965 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. 31 ऑगस्ट 2019पर्यंत 1201 इतक्या सेना दलातील मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
सन 2014 साली मतदारांना वाटप करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार ओळखपत्राचे प्रमाण 94.10 टक्के होते. सन 2019मध्ये हे प्रमाणे 96.24 टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांची संख्या 16 हजार 901 आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार 714 मतदान केंद्र आहेत. निवडणुकीसाठी 13 हजार 900 कर्मचारी नेमण्यात आले असून, 44 भरारी पथकेही असतील. निवडणूक शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या होण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.