पनवेल ः प्रतिनिधी
महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आजपर्यंत एकूण तीन हजार 940 लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालये नाहीत, अशा कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय उपलब्ध करून देणे, अशाप्रकारे शहरातील प्रत्येक कुटुंबाला शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन शहर हागणदारीमुक्त करणे तसेच शहरामध्ये ओडीएफ, ओडीएफ+, ओडीएफ++ व वॉटर प्लस अशा स्वच्छतेविषयक स्पर्धा घेणे, असे स्वच्छ भारत अभियानाचे स्वरूप आहे. यासाठी निधीची उपलब्धता रु.12 हजार (केंद्र- 4 हजार + राज्य 8 हजार), स्थानिक स्वराज्य संस्था रु. 8 हजार (14 वा वित्त आयोग-5 हजार+ मनपा निधी-3 हजार) असा एकूण लाभ रु. 20 हजार प्रति शौचालय देण्यात येतो.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) योजनेंतर्गत लाभ – महानगरपालिका हद्दीमध्ये एकूण तीन हजार 940 लाभार्थ्यांना स्वच्छ भारत अभियान (नागरी)अंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.
माझ्या घरामध्ये लहान मुली असल्याने सार्वजनिक शौचालय वापरण्यास अडचणी येत होत्या, परंतु स्वच्छ भारत अभियानांतर्गत मी वैयक्तिक शौचालय बांधल्यामुळे आज आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. शौचालय बांधकामासाठी पालिकेकडून 20,000 अनुदान मिळाल्याने आभारी आहोत.
– सुनिता केसला, पनवेल