कर्जत : बातमीदार
नेरळ गावातील गंगानगर भागात घरफोडी झाली असून, त्यात अज्ञात चोरट्यांनी 53 हजारांची रोख रक्कम आणि तब्बल आठ लाख 56 हजारांचे दागिने लंपास केले आहेत. गंगानगर भागात स्वप्नील मधुकर लिंडाइत (31) यांचे घर आहे. मंगळवारी (दि. 24) रात्री त्यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी आणि लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी 53 हजारांची रोख रक्कम आणि साखळी, गंठन, ब्रेसलेट, अंगठ्या असे आठ लाख 56 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. नेरळ पूर्व भागात मेडिकल स्टोअर चालविणारे लिंडाइत यांच्या ही बाब बुधवारी सकाळी लक्षात आली. त्यांनी या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक भोर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर अलिबाग येथून श्वानपथक बोलाविण्यात आले असून, चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालचिम करीत आहेत.