पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना काळात रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी सर्वसामान्यांची प्रचंड दमछाक झाली. वेळेत बेड न मिळाल्याने अनेकांना प्राणाला मुकावे लागले. ही अडचण लक्षात घेऊन पनवेलचे माजी उपमहापौर तथा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून बेड उपलब्ध करण्यासाठी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच मोठा दिलासा मिळत आहे. लसीकरणासाठी नागरिकांचे संपर्क कार्यालयात रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर लसीकरण केंद्रावर दररोज सकाळी कार्यकर्ते रांगेत उभे राहून टोकन घेतात. या पद्धतीने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नागरिकांना लसीकरणासाठी नेले जाते, तसेच ज्येष्ठ नागरिकांना तसेच ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही अशा गरीब गरजूंना मोफत लसीकरण केंद्रावर जाण्यायेण्यासाठी रिक्षाची सोयदेखील उपलब्ध करण्यात आली आहे. विक्रांत पाटील यांनी पुढाकार घेत यासाठी काही महिन्यांपूर्वी नागरिकांना लसीकरणासाठी होणारा त्रास, लावाव्या लागणार्या रांगा या सगळ्याकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना करण्याचे ठरवले. सर्व नागरिकांचे सोयीस्कररीत्या व सुलभतेने लसीकरण उपक्रमाच्या अंतर्गत आजपर्यंत विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून 2000 हुन अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 1200हून अधिक पाहिले डोस तर 800हून अधिक दुसरे डोस याप्रमाणे सध्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मागील वर्षीदेखील विक्रांत पाटील यांच्यामार्फत गॅस सिलेंडर, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तू नागरिकांना घरपोच नेऊन दिल्या जात होत्या. यावर्षीदेखील गरजूंना, रिक्षाचालकांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटर तसेच काही दिवसांपूर्वी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय अशा विविध प्रकारे सात्यत्याने मदतीचा ओघ विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून सुरूच आहे.