नागोठणे : प्रतिनिधी
प्लास्टिक पिशवीचा वापर न करण्यासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीकडून जनजागृती करण्यात येत आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून यासंदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी स्पष्ट केले. शासनाच्या निर्देशानुसार नागोठणे ग्रामपंचायतीची प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरील विशेष ग्रामसभा 17 सप्टेंबरला येथील ग्रामसचिवालयात घेण्यात आली होती. त्यात 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याची गांधी जयंतीपासून अंमलबजावणी करण्यात येणार असली तरी ज्यांच्याकडे बंदी घातलेल्या पिशव्यांचा साठा असेल, त्यांनी 26 ऑक्टोबरपर्यंत त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सूतोवाच सरपंच डॉ. धात्रक यांनी केले.
या वस्तूंचा वापर करण्यावर बंदी
सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्या व एकदाच वापरल्या जाणार्या ताट, कप, प्लेट, ग्लास, वाटी आणि चमचे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकिंगसाठी वापरली जाणारी भांडी व वाटी, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिकचे पाऊच व कप आणि 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी घालण्यात आली आहे. हे साहित्य वापरणार्या व्यावसायिकाला पहिल्या वेळी पाच हजार, दुसर्या वेळी दहा हजार आणि तिसर्यांदा हा गुन्हा केल्यास 25 हजार रुपये दंड व तीन महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
ग्रामसभेत दिलेल्या सूचनेनुसार प्लास्टिक पिशवीचा दुकानात वापर न करण्याचे आवाहन संघटनेतील व्यापारी सदस्यांना केले आहेे. 15 दिवसांत प्लास्टिक पिशवीचा वापर न करण्यावर व्यापार्यांनी भर दिला असून, नागोठणे ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याची आमची कायम भूमिका राहील.
-प्रकाश जैन, अध्यक्ष, व्यापारी संघटना, नागोठणे
नागोठण्यातील सर्व व्यावसायिकांनी प्लास्टिकऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यास नागोठणे ग्रामपंचायतीमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे व त्यासंबंधीची नोटीस सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना लवकरच देण्यात येणार आहे.
-मोहन दिवकर, ग्रामविकास अधिकारी, नागोठणे