
कर्जत : बातमीदार
महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) नेरळमधील हुतात्मा स्मारक परिसरात वन विभागाच्या वतीने पिंपळ झाडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावर्षी राज्यात वन विभागाने 33 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या उद्दिष्ट्यपूर्तीची आठवण राहावी म्हणून वन विभागाने महात्मा गांधी जयंतीदिनी पिंपळ वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात ज्या ठिकाणी हुतात्म्यांची स्मारके आहेत, त्या सर्व ठिकाणी पिंपळाची वृक्ष लावली जाणार होती. त्याचाच एक भाग म्हणून नेरळ येथील माथेरानकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या हुतात्मा चौकात बुधवारी पिंपळ जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कृषिरत्न पुरस्कारप्राप्त शेतकरी शेखर भडसावळे यांच्या हस्ते पिंपळ वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी वनक्षेत्रपाल नारायण राठोड, वनपाल दत्तात्रय निरगुडा, वनपाल शंकर पवार, गोपाळ मराठे आदींसह नेरळमधील पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. हुतात्मा स्मारक समिती आणि वन विभाग यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.