Breaking News

मुरूड समुद्रकिनारी टपरीधारकांचे व्यवसाय सुरू

मुरूड ः प्रतिनिधी 

मुरूड समुद्रकिनारी सुमारे 44 टपरीधारक असून त्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे  त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, परंतु खचून न जाता त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्यासुद्धा बनवण्यात येऊन पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. चहाची टपरी त्याचप्रमाणे अल्पोपाहार व भोजन बनवून देणार्‍या सर्व टपर्‍या तसेच दुकाने संचारबंदीमुळे प्रदीर्घ काळ बंद होती. आता अनलॉकमध्ये व्यवसाय सुरू होऊन या भागातीन रेलचेल वाढली आहे.

येथे काही प्रमाणात पर्यटकांचा ओघही सुरू झाल्याने सध्या या टपर्‍यांवरील व्यवसायाला सुरुवात झाली आहे, परंतु सध्या अचानक पावसाची सुरुवात झाल्याने व्यवसायात व्यत्यय येत आहे. पाऊस कमी असेल तर पर्यटक जास्त प्रमाणात येतात, परंतु पाऊस बरसल्याने आमच्या व्यवसायात मोठी घट झाली, असे टपरीधारकांनी सांगितले. स्वच्छ सूर्यप्रकाश व ऐतिहासिक जंजिरा किल्ला सुरू झाल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होत त्याचा फायदा समुद्रकिनारी असणार्‍या टपरीधारकांना होणार आहे.

जंजिरा किल्ला पर्यटकांना खुला झाल्यावर पर्यटकांची संख्या वाढेल. निसर्ग चक्रीवादळाची मदत अनेक  टपरीधारकांना अद्याप मिळाली नाही. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात दुकाने उघडण्यात आली आहेत. याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळात बहुतांश टपर्‍यांचे नुकसान झाले. यातील काही टपरीधारकानी कर्ज काढून आपल्या हातगाड्यांची दुरुस्ती केली, तर काही जण दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत. कठीण परस्थितीतही आपले दुःख विसरून टपरीधारकांनी व्यवसाय सुरू केला आहे. शासनाने त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply