कर्जत : वार्ताहर
कर्जत शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने करण्यात येणारे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी कर्जत नाभिक समाज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. ही मागणी मान्य न झाल्याने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर 144 / 19 मध्ये गैरमार्गाने सुरु असलेल्या बांधकामाबाबत तहसील कार्यालयाकडे विविध तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. तरीदेखील गेल्या दोन वर्षात अधिकारी आणि घोटाळा करणार्या व्यक्ती विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली दिसून आलेली नाही. तसेच कर्जत नगरपालिका मुख्याधिकारी यांनीदेखील मैदान म्हणून वापरण्यास दिलेल्या जागेवर बांधकामाचा आराखडा मंजूर केलेबाबत अहवाल दिलेला आहे. त्यानुसार शर्थभंग झाल्याचे वस्तुनिष्ठ पुरावे शासनाकडे प्राप्त झाले आहे. असे असतानादेखील जाणीवपूर्वक कारवाई केली जात नसल्याचे आरोप या निवेदनात करण्यात आले आहेत. 1 जानेवारी 2021 पर्यंत जमिनीवरील बांधकाम थांबवण्यासाठी आणि जमीन शासनजमा करण्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती.
कर्जत मधील नाभिक समाज बांधवांची दुकाने बेमुदत काळा करता बंद ठेवून संस्थेच्या वतीने कर्जत येथील टिळक चौक येथे आमरण उपोषण करण्यात आले. यामध्ये राहुल कोकरे व हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळा संघर्ष समितीचे अॅड. हृषिकेश जोशी उपोषणास बसले असून रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाचे अध्यक्ष सुदाम शिंदे, कार्याध्यक्ष रवींद्र देवकर, सचिव अनंत खराडे, उपाध्यक्ष भगवान निमुतकर, अशोक यादव, दिलीप शिंदे, राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. भाजप तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे आदींनी उपोषण स्थळी येऊन उपोषणाला पाठिंबा दिला.