कर्जत : बातमीदार
माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनीट्रेन बंद असल्याने येथील नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. ही मिनीट्रेन लवकरात लवकर सुरू न केल्यास नेरळ येथे रेल रोको करण्याचा इशारा माथेरानमधील नागरिकांनी दिला आहे. अतिवृष्टीमुळे जागोजागी दरडी पडल्यामुळे व काही भागात रेल्वे रुळाखालील जमीन वाहून गेल्यामुळे मिनीट्रेन बंद झाल्यानंतर पर्यटकांची संख्या रोडावली. त्यामुळे माथेरान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, आरपीआय अध्यक्ष अनिल गायकवाड, व्यावसायिक सुरेश धोमकर यांनी आंदोलनासंदर्भात सर्वपक्षीय, सर्व समाज, सर्व संस्था यांच्या सह्यांचे निवेदन मध्य रेल्वेचे डीआरएम संजीवकुमार जैन यांना दिले. मिनीट्रेनमुळे जास्त पर्यटक येतात. त्यामुळे येथील जनतेला रोजगार मिळतो, पण 28 जुलैपासून सुरक्षेच्या कारणास्तव मिनीट्रेन बंद करण्यात आल्याने माथेरानमधील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गहन होणार आहे. मिनीट्रेन पुन्हा सुरू करावी यासाठी अधिकार्यांची मनस्थिती दिसत नाही. त्यामुळे माथेरानमधील सर्व स्थानिक पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासाठी मुंबईच्या डीआरएम कार्यालयात जाऊन संजीवकुमार जैन यांना माथेरानकरांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात मिनीट्रेन लवकर सुरू न केल्यास नेरळ येथे जाऊन रेल रोको केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.