मोहोपाडाः वार्ताहर
चौक येथील गुणगौरव व पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या रोपांची लागवड शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसोबत करून शिक्षकांनी पर्यावरणाचा जागर केला. दिलासा फाऊंडेशन दरवर्षी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गुणीजन गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव करते. यंदाही 18 शिक्षकांना गौरविण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळाच्या जोडीने पुष्पगुच्छाच्या ऐवजी औषधी रोपांचे वाटप करण्याची प्रथा दिलासा फाऊंडेशनने जपली. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यानीही दिलासा फाऊंडेशनच्या वृक्ष चळवळीचे कौतुक करताना ज्याप्रमाणे विद्यार्थी घडवतो, त्याप्रमाणेच रोपांची जपणूक करत पर्यावरण टिकविण्याचे कार्य असल्याचे सांगितले. यंदाही पुरस्कारार्थी आणि उपस्थित मान्यवरांना रोपांचे वाटप करून त्याची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले.