पनवेल : बातमीदार
तळोजा येथे गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून मालकांकडून गाड्या ताब्यात घेऊन त्यांचे भाडेदेखील न देणार्या आरोपी विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 23 मालकांच्या 23 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. मनोज काळूराम पाटील (42) असे या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तळोजा पाचनंद येथे राहणारा मनोज नागरिकांना गाड्या भाड्याने लावतो व महिन्याला ठराविक रक्कम देतो, असे सांगत असे. या बोलण्याला अनेक नागरिक फसले व त्यांनी आपले चारचाकी वाहन त्याच्याकडे भाड्याने लावण्यासाठी दिले. तसे अग्रीमेंट देखील करून घेतले, मात्र 2018पासून आजतागायत नागरिकांना आपले वाहन व गाडीचे भाडेदेखील मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिराप्पा लातुरे यांनी आरोपीचा शोध घेतला असता त्याला ताळोजे येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विविध कंपनीच्या 83 लाख रुपये किमतीच्या 23 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.