Breaking News

महाआघाडीसमोर महायुतीचे महाआव्हान

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर घटस्थापना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सारे एकत्र असल्याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केली. तत्पूर्वी जागावाटप पूर्ण होऊन सगळ्यांचे उमेदवारी अर्जदेखील दाखल झाले. इतके दिवस रखडलेला व गुंतागुंतीचा बनलेला युती, जागावाटप अन् उमेदवारीचा तिढा मुख्यमंत्र्यांनी खमकेपणा दाखवून आणि तितक्याच थंड डोक्याने सोडविला. त्यामुळे साहजिकच काँग्रेस, राष्ट्रवादी व घटक पक्षांच्या महाआघाडीचे टेन्शन वाढले असेल.

भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात झालेले ‘इनकमिंग’ पाहता यंदा इच्छुकांची संख्या खूपच वाढली होती. भाजपमध्ये तर ‘मेगाभरती’ झाल्याने तिकीटवाटपाची कसरतच होती. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 288 जागांवर लढण्यासाठी सक्षम उमेदवार नसल्याने महाआघाडीकडून त्यांच्या घटक पक्षांना मुक्तहस्ते जागा सोडल्या जात असताना इकडे युतीमध्ये एकेका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. अशा परिस्थितीत यंदाही युती होत नाही, अशी अटकळ बांधली जात होती. अगदी युती झाल्याचे संयुक्त पत्रक जारी झाल्यानंतरही त्यावर विश्वास ठेवायला कुणी तयार नव्हते, पण एव्हाना सारे काही स्पष्ट झाले आहे.

युतीचे गणित सुटले आणि भाजप, शिवसेनेसह मित्रपक्षांतील अनेकांचा जीव भांड्यात पडला. मागील पाच वर्षांत बळकट झालेली पक्षसंघटना, त्यातून पुढे आलेले दावेदार आणि विरोधी पक्षांतून अनेक बड्या नेत्यांनी केलेले पक्षांतर यामुळे निवडणूक लढविण्याची तीव्र स्पर्धा भाजपमध्ये निर्माण झाली होती. त्यातून कुणाला उमेदवारी द्यायची, तसेच सहकारी पक्षांना किती व कुठल्या जागा सोडायच्या असे अनेक प्रश्न होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आव्हान लीलया पेलत कुशल योद्ध्याची भूमिका चोख बजावली. शिवसेनेनेही मोठा भाऊ-छोटा भाऊ असा वाद न घालता नरमाईचे धोरण स्वीकारून राजकीय शहाणपण दाखविले. अन्य पक्षांनीही कुरबुर न करता वाट्याला येईल ते गोड मानून घेतले.

महायुतीमध्ये भाजप 150, शिवसेना 124 आणि मित्रपक्ष 14 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने चार याद्या मिळून 150 जणांची नावे उमेदवार म्हणून जाहीर केली. यामध्ये कणकवली आणि कामठी या मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश नव्हता. कणकवलीत नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना आणि कामठीमध्ये टेकचंद सावरकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपचे राज्यात 152 उमेदवार होऊन मित्रपक्षांच्या जागांची संख्या 12वर आली आहे. मित्रपक्षांमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंला सहा जागा सोडण्यात आल्या आहेत, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि आमदार विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना यांच्या वाट्याला प्रत्येकी दोन जागा आल्या आहेत. यापैकी रयत क्रांती आणि शिवसंग्राम या संघटना भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपतर्फे एकूण 156 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, वेगवान आणि लोकाभिमुख कारभारातून जनतेची मने जिंकली आहेत. मागील पाच वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालातून त्याचा प्रत्यय आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि सहकार्‍यांचे मुख्यमंत्री व टीमला मोठे पाठबळ आहे. तशा प्रकारे काँग्रेसला मात्र वरिष्ठ पातळीवरून साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीला मर्यादा आहेत. त्यातच ‘मेगागळती’ने दोन्ही काँग्रेस संघटना गर्भगळीत झाल्या आहेत. परिणामी आधीच बॅकफूटला गेलेल्या महाआघाडीसमोर जोमात असलेल्या महायुतीचे मोठे आव्हान आहे.

राहिला प्रश्न युतीतील बंडखोरीचा, तर ती अपेक्षितच होती. कारण जेव्हा निवडणूकपूर्व कल आपल्या पक्षाच्या बाजूने असतो, तेव्हा इच्छुकांची संख्या वाढून हमखास बंडखोरी होत असते. किंबहुना विधानसभा निवडणुकीला ती सर्वच प्रमुख पक्षांमध्ये होते. तिकीट न मिळाल्याने आघाडीतदेखील काही जणांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. याबाबत पक्षीय पातळीवर काय तो निर्णय होईल. असे म्हणतात प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सारे काही क्षम्य असते. अर्थात आपली ताकद आणि जनाधार लक्षात घेऊनच कुणीही निवडणूक लढविली पाहिजे. फुकाचा बाजार मांडण्यात काय मतलब. असो, होऊ घातलेल्या विधानसभा महासंग्रामात जो उमेदवार जिथून निवडून येईल तोच तिथला सिकंदर ठरणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 40 जणांच्या या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांसह यंदा विधानसभेचे तिकीट न मिळालेल्या एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचा समावेश आहे. संघाच्या तालमीत घडलेले खडसे व तावडे या दोघांनीही सबुरीचे धोरण स्वीकारले असून, तेच त्यांच्या हिताचे आहे.

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 10, तर गृहमंत्री अमित शहा 20 सभा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अद्याप या सभांचे वेळापत्रक समोर आले नाही, पण मोदी-शहा जोडी महाराष्ट्र पिंजून काढेल. काँग्रेस आघाडीची मदार गांधी घराण्यावर अवलंबून आहे, तर राष्ट्रवादीकडून शरद पवार एकाकी लढत आहेत. लोकसभा निवडणुकीत स्वत: न लढता आघाडीच्या व्यासपीठावरून युतीवर विशेषत: भाजपवर वार करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीनंतर चुप्पी साधली आहे. आता स्वतंत्रपणे लढताना ते आघाडीविरोधात बोलणार की पुन्हा लोकसभेची री ओढणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तापमानाचा पारा वर सरकत असताना राजकीय वातावरणही तापू लागले आहे. 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 19 तारखेला संध्याकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यामुळे येत्या काळात प्रचाराची राळ उठून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघेल. म्हणूनच पुढील 15 दिवस सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत.

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply