पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात मागील काही महिन्यापासून चार चाकी आणि दुचाकी वाहनाच्या गाडीच्या काचा फोडणे, वाहने जाळून टाकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आज पुन्हा पर्वती पायथा येथील एका इमारतीच्या पार्किंगमधील 11 वाहनांना एकाने आग लावल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा, सानेगुरुजी शाळेसमोर असणार्या एका इमारतीच्या पार्किंगमधे आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास 11 गाड्यांना एका व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे. या आगीत सहा दुचाकी, एक रिक्षा पूर्ण जळाल्या असून, चार दुचाकींना देखील आगीची झळ बसली आहे. ज्या व्यक्तीने ही आग लावली आहे, त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे दत्तवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पर्वती पायथा या ठिकाणी असलेल्या सानेगुरुजी शाळेसमोरच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला आहे. या आगीत सहा दुचाकी एक रिक्षा जळून खाक झाली आहे, तर इतर चार दुचाकींनाही याची झळ बसली आहे. याआधीही पुण्यात असे प्रकार घडले आहेत. आता पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.