‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे सोमवारी पनवेलकरांनी मुग्धाताई लोंढे यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने पुन्हा एकदा अनुभवले असे म्हणायला हरकत नाही. सोमवारची सकाळ पनवेलकर सगळे आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करायचा म्हणून उत्साहात होते. भगवे फेटे बांधून आलेल्या प्रत्येकाच्या चेहर्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. त्यामध्ये नेहमी हसतमुख असणार्या मुग्धाताईसुद्धा होत्या. ताई आपल्या 50 सहकारी महिलांसह फेटे बांधून उत्साहात सेल्फी काढत होत्या. खरं तर त्यांना फोटोग्राफरकडून सगळ्या ग्रुपचा फोटो काढून घ्यायचा होता. त्यांनी त्यासाठी फोन करून सांगितलेही होते, पण नियतीच्या मनात नव्हते; त्यामुळे फोटोग्राफर त्यांच्यापर्यंत पोहचू शकला नाही. त्या वेदना स्वत: लक्ष्मण ठाकूर यांनी फेसबुकवर व्यक्त केल्या आहेत. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रशांतदादांना पंचारतीने ओवाळायची इच्छा मुग्धाताईंना होती, पण नियतीने त्यांची ती इच्छादेखील पूर्ण केली नाही. मिरवणूक पोहचण्यास उशीर होत असल्याचे लक्षात आल्यावर अर्ज दाखल करण्याची वेळ निघून जाईल म्हणून प्रशांतदादा त्यांच्या घराजवळ आल्यावर मिरवणूक सोडून मोटरसायकलवर बसून निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात निघून गेले. त्या मात्र पंचारती घेऊन त्यांची वाट पाहत उभ्या राहिल्या. मिरवणूक जवळ आल्यावर बघितले तर प्रशांतदादा नाहीत. थोडासा विरस नक्कीच झाला, पण संघाच्या तालमीत तयार झालेल्या त्यांनी चेहर्यावर कोणतेही भाव दाखवले नाहीत. दुपारपासून प्रशांतदादांना निवडून आणण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन सुरू केले, पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते.
सगळे कार्यकर्ते रात्री प्रचाराच्या धामधुमीत; तरुणाई दांडिया खेळण्याच्या गडबडीत असताना अचानक फोन वाजला आणि पनवेल स्तब्ध झाले… हो गजबजलेले पनवेल निशब्द झालेले पाहायला मिळाले. अचानक पनवेल शहरातील दांडियाचा आवाज बंद झाला. थोडावेळ कोणालाच समजले नाही काय झाले. नवीन पनवेलमधील भुजबळवाडीतील दांडियाचा आवाज आज लवकर कसा बंद झाला म्हणून घरी चर्चा सुरू असतानाच मोबाईलवर मेसेज आला. पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांचे अपघाती निधन. पहिला विश्वासच बसत नव्हता. अनेक जणांना फोन केल्यावर खात्री झाली. मन हळहळलं, बधीर झालं… मृत्यू कधीही येऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य असलं, तरी असा मृत्यू आला की मनाला नाहीच पटत. राजकीय क्षेत्रात आता कुठे त्यांचे काम नीट सुरू होत होते. त्या राजकारणात असल्या तरीही मनाने सहृदय… शांत… हसर्या असणार्या ताई… आता आपल्यात नाही हे मनाला पटतच नव्हते. महापालिकेत काम करताना स्वपक्षाबरोबरच विरोधकांची काळजी घेणार्या, त्यांना प्रसंगी समजावणार्या, खडसावणार्या आणि नवीन नगरसेविकांची आपुलकीने चौकशी करणार्या आणि पनवेलकरांची क्षुधा तृप्त करणार्या ताई आज आपल्यातून निघून गेल्या, हे समजताच कधी नव्हे ते पनवेल निःशब्द झालेले पाहायला मिळाले.
-नितीन देशमुख, फेरफटका