Monday , February 6 2023

अंमली पदार्थांचा विळखा

एकट्या 2017 या वर्षांत जगभरात पाच लाख 85 हजार लोक हे अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडल्याची नोंद आहे. आता वेदनाशामक गोळ्यांचाही अंमली पदार्थांसारखा उपयोग केला जाताना दिसतो व त्याविषयीही संबंधितांकडून चिंता व्यक्त केली जाते. इंजेक्शनद्वारे घेतल्या जाणार्‍या अंमली पदार्थांमुळे अन्य आरोग्यविषयक समस्यांसोबतच एचआयव्हीचा फैलावही होताना दिसतो. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा या समस्येला कसे तोंड द्यावे याबाबत आपल्याकडील यंत्रणा अद्यापही गोंधळलेल्याच दिसतात.

संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थविषयक ताज्या अहवालानुसार जगभरातच 2009च्या तुलनेत अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांची संख्या सुमारे 30 टक्क्यांनी वाढली आहे. जगभरातील निरनिराळ्या देशांत मिळून अंदाजे तीन कोटी 50 लाख लोक अंमलीपदार्थांच्या व्यसनातून उद्भवणार्‍या विविध आजारांचे शिकार झाल्याची नोंद आहे. या अहवालात भारत आणि नायजेरिया या दोन देशांमध्ये केलेल्या सखोल पाहणीचाही समावेश आहे. या अहवालात समोर आलेली परिस्थिती मुंबईतील सद्यस्थितीचे वास्तवच रेखाटणारी आहे. मुंबई शहरात आजच्या घडीला अल्पवयीन मुलांचे अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. विशेषत: झोपडपट्ट्यांमधील मुले या व्यसनांच्या विळख्यात खूपच लहान वयापासून ओढली जातात. प्रामुख्याने या अंमली पदार्थांच्या विक्री व्यवहारासाठी या मुलांचा वापर केला जातो व त्यासाठीच त्यांना या व्यसनांच्या जाळ्यात ओढले जाते. एकदा या व्यसनांच्या आहारी गेले की ही मुले मग त्यासाठी चोर्‍यामार्‍याच करायलाही मागे-पुढे पाहात नाहीत. कमालीची आर्थिक विषमता, आजूबाजूला बोकाळलेला चंगळवाद यातून ही मुले प्रचंड मानसिक तणावाखाली असतात. त्यातच कुणीतरी चुचकारून त्यांना या नादाला लावते व एखाद्या क्षणी मानसिक अवस्था दुबळी असताना या वाटेकडे वळण्याची इच्छा नसलेली मुलेही त्यात अडकतात. हे असेच वागायचे असते, किंबहुना हे असे वागले म्हणजेच तुमचा हव्याहव्याशा मित्रमंडळींमध्ये शिरकाव होऊ शकतो या अपसमजांतून महाविद्यालयीन विद्यार्थी याकडे वळतात. आधी सिगारेट, मग दारू आणि रात्री उशीरापर्यंत चालणार्‍या पार्ट्या यातूनच कधीतरी त्यांची अंमली पदार्थांच्या नशेशी ओळख होते. उच्चभू्र शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात वा अवतीभवती या अंमलीपदार्थांच्या खरेदीविक्रीचे व्यवहार चालतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत संबंधित संस्थांचे प्रशासन त्याला अटकाव करण्याचा प्रयत्नही करते. परंतु व्यक्तिगत पातळीवर लक्ष ठेवणे त्यांनाही शक्य नसते. विशिष्ट वर्गातील पालक स्वत:च आपल्या कामकाजाच्या, व्यवसायाच्या रगाड्यात इतके बुडालेले असतात की पाल्यांना त्यांच्या मागणीनुसार पैशाचा पुरवठा करण्यापलीकडे त्यांचे आपल्या पाल्याच्या वर्तणुकीकडे लक्षही नसते. आणि अंमली पदार्थांची चव एकदा चाखली की त्यापासून सुटका मिळवणे दिवसेंदिवस कठीणच होत जाते. कोणे एकेकाळी दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू वसाहतींपुरती मर्यादित असलेली ही समस्या केव्हाचीच पूर्व-पश्चिम उपनगरे व आसपासच्या परिसरातील निम्न मध्यमवर्गीय भागांतही ठाण मांडून बसली आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यातून निव्वळ आरोग्यविषयक समस्याच उद्भवतात असे नव्हे तर गुन्हेगारीशीही त्यांचा नजीकचा संबंध असतो आणि या समस्येचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय तस्करीपर्यंत जोडलेले असतात. अलीकडच्या काळात नोंदल्या गेलेल्या आकडेवारीनुसार अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये देखील वाढ झालेली दिसते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply