Breaking News

मोदी सरकार वंचितांच्या पाठीशी -अमित शहा; भगवानगडावर दसरा मेळावा उदंड उत्साहात

बीड : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार वंचित, शोषित, बहुजनांसाठी काम करीत आहे. गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत मार्गी लावले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (दि. 8) सावरगाव येथील भगवानगडावर दसरा मेळाव्यात बोलताना केले. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात. अशीच मात आपल्याला या निवडणुकीत करायची आहे, असे सांगून पुन्हा एकदा भाजपला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

भारतातील जनतेने लोकसभा निवडणुकीवेळी 300पेक्षा जास्त जागा मिळवून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जो विश्वास दाखवला, त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी अनुच्छेद 370 रद्द करून अवघा देश एक केला. मागील 70 वर्षांमध्ये प्रलंबित होते ते निर्णय पाच महिन्यांत मार्गी लावले, असे म्हणत अमित शहा यांनी मोदींचे कौतुक केले, तसेच त्यांचे हे कार्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने घरोघरी पोहोचवा, असेही त्यांनी सूचित केले.

आपल्या भाषणात शहा यांनी गोपीनाथ मुंडे आणि भगवानबाबा यांचा आवर्जून उल्लेख केला. या दोघांच्या वाटेवर पंकजा मुंडे वाटचाल करीत आहेत. त्यांना तुमचा आशीर्वाद हवा आहे. तो द्या आणि भाजपला बहुमताने विजयी करा, असेही ते या वेळी म्हणाले.

‘लोकांच्या मनावर राज्य करणे आवश्यक’

सर्वसामान्यांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी जी लढाई लढली ते काम आता सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद घेतला तेव्हा ते मला खूश राहा म्हणाले. त्या वेळी मला समजले की मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणे आवश्यक आहे, असे उद्गार महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. अमित शहा पुन्हा भगवानबाबांच्या दर्शनासाठी गडावर आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply