Breaking News

बाबल्या आणि मित्र मंडळाची संशयितावर नजर

नितीन देशमुख – पनवेल : पाकिस्तानने अखेर घुडगे टेकून अभिनंदनला भारताच्या हवाली केले. रात्री उशिरापर्यंत आमच्या सोसायटीत बाबल्या आणि त्याच्या मित्रांच्यात या विषयावर चर्चा रंगली होती. एक एक जण तावातावाने आपले म्हणणे मांडत होता, पण सगळ्यांचे एकमत होते की दहशतवादी पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न नक्की करणार. यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण काय करायला हवे यावर त्यांची चर्चा सुरू झाली. गुप्तचर संघटनांनी मुंबई आणि रेल्वेला टार्गेट केले जाईल, असा इशारा दिला असल्याने आपण सतर्क राहिले पाहिजे, असे ठरवण्यात आले.

नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी आणि एन.एम.एम.टी.च्या बस चालकाने पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या ओसाड पडलेल्या बिल्डिंगमध्ये कोणी राहत नसताना या बिल्डिंगमध्ये संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना कळवल्यावर खांदेश्वर पोलीस  सिनेमातील पोलिसांप्रमाणे चार-पाच तासानेच नव्हे तर दोन दिवसांनी  आल्याचा किस्सा पक्याने सांगितला. त्याचवेळी आपल्या मैत्रिणीचा अनुभव एकाने सांगितला. ती चार दिवसांपूर्वी पनवेल रेल्वे स्टेशनवर महिलांच्या शेवटच्या डब्यातून उतरताना तिला डब्यात एक पांढर्‍या रंगाची पिशवी सीटखाली ठेवलेली दिसली. अशी पिशवी सर्वसाधारणपणे महिला वापरत नाहीत. त्यामुळे तिने गाडीच्या गार्डला याबद्दल  सांगितले असता त्याने आता माझी ड्यूटी संपत आहे, असे सांगून तिच्याकडे लक्ष दिले नाही. ती पुढे चालत आली. तिने गाडीच्या मोटरमनला माहिती दिली आणि पोलिसांना कळवायला सांगितले. त्याने पोलिसांना कळवले. या सगळ्या अनुभवामुळे आपल्याला पोलीस किंवा रेल्वे कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळेलच याची शक्यता नसल्याने आपणच काहीतरी केले पाहिजे असे सगळ्यांनी ठरवले. दुसर्‍या दिवशी सकाळपासून बाबल्या आणि त्याचे मित्र कामाला लागले. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ओसाड बिल्डिंगकडे खास लक्ष ठेवण्याचे ठरले. काही संशयास्पद हालचाल जाणवल्यास लगेच सगळ्यांना सतर्क करायचे आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी येऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा.  अरे, पण त्यांच्याजवळ शस्त्र असतील तर आपण काय करणार अशी शंका एकाने काढलीच. साडूने लगेच त्याला अरे, तू डॉनमध्ये अमिताभ बच्चन कसा रिकामे पिस्तूल घेऊन पोलिसांना फसवतो पाहिलेस ना, आपण पण खेळातील पिस्तूल दाखवून त्यांना पकडायचे, असे सांगून तो मुद्दा खोडून काढला. सर्वांनी माना डोलावल्या. संध्याकाळी अचानक सगळ्यांच्या मोबाईलवर पक्याचा मेसेज आला. पडक्या बिल्डिंगकडे या. सगळे धावत निघाले. बिल्डिंगच्या खाली पक्या सगळ्यांची वाट पाहत होता. पक्याने त्याला  दुसर्‍या मजल्यावरील त्या खिडकीत थोड्या वेळापूर्वी हालचाल दिसली. हसण्याचे आणि कुजबुजण्याचे आवाज आल्याचे सांगितले. आता आपण काय करायचे याची चर्चा सुरू झाली. त्याच वेळी पुन्हा त्या खिडकीतून हसण्याचे आवाज आले. त्याबरोबर सगळे एकदम शांत झाले. बिल्डिंगमध्ये नक्कीच कोणीतरी असणार याची खात्री त्यांना झाली. त्यांच्याजवळ शस्त्र असली तर एकाने शंका काढली. अंधार  झाल्याने आतले काहीच दिसत नव्हते. सगळेच घाबरले होते, पण आपण घाबरलो नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी जिन्यावरून कोणीतरी खाली उतरत असल्याचा आवाज आला. सगळे लपून बसले. आता काय पाहायला मिळणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली होती. ब्ल्यू जीन्स, टी-शर्ट, पायात बूट घातलेला एक माणूस  मोबाईलवर बोलत खाली उतरला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि स्टेशनचा रस्ता धरला, पण कोणाची त्याला अडवायची हिंमत झाली नाही. आपल्या हातातून एक दहशतवादी गेल्याचे दु:ख त्यांना झाले. तो गेल्यावर कोण असेल याबद्दल हळू आवाजात चर्चा सुरू झाली. तेवढ्यात तेथे आलेल्या पक्याच्या मित्राने त्यांना सांगितले की, हा माणूस पूर्वी अग्निशमन केंद्राजवळच्या पडक्या बिल्डिंगमध्ये राहत होता. तेथून हाकलल्यावर तो इकडे आलेला दिसतो. हे ऐकताच पुन्हा सगळे उत्साहाने बोलू लागले. पुन्हा आला तर त्याला कसे पकडायचे याचे बेत करू लागले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply