Breaking News

फणसाड अभयारण्य; पर्यटकांचे आकर्षण

मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरूड, रोहा व अलिबागच्या सीमारेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 154 किलोमीटर अंतरावर पनवेल, पेण व अलिबाग मार्गावर विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदानच आहे.

नवाब काळापासून सदरचे क्षेत्र शिकार क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून या ठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण व वृक्षतोडीला प्रतिबंध बसला आहे. विस्तीर्ण अशा या अभयारण्यात साग व निलगिरीची उंच अशी भलीमोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली या भागात आढळून येते. ऐन, किंजल, जांभूळ, हेड, कुडा, गेळ, अंजली, कांचन, सावर याचबरोबर सीता अशोक, सर्पगंधा, रानतुळस, कुर्डू, कडीपत्ता, उक्षी या औषधी वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आढळून येतात.

25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून येथे वृक्षसंपदा व वन्यजीव प्राण्यांसाठी मोठी दक्षता घेतली जात आहे. जगातील सर्वांत लांब असलेल्या वेलीपैकी एक असलेली गारंबीची वेल या ठिकाणी आढळून येते. 90 प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. फुलपाखरांमध्ये ब्लू मारगोन, मॅप, कॉमन नवाब अशा वैशिष्ट्यपूर्ण जाती आढळून येतात. पक्ष्यांच्या 164 प्रजाती या ठिकाणी आढळतात. घुबड, तुरेवाला सर्पगरूड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरियाल, कोकीळ यांसारखे रंगीबेरंगी पक्षी येथे वास्तव्यास आहेत.

फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, त्रास, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरूसुद्धा (मोठी खार) येथे आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी गिधाडे येथे मोठ्या संख्येने आढळतात. अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या फणसाड अभयारण्याची निसर्गप्रेमींना भुरळ न पडेल तरच नवल. पर्यटकांना निवासासाठी 10 राहुट्यांसह विश्रामगृहदेखील उपलब्ध असून बैलगाडीतून फेरफटक्याची सोय आहे. स्थानिक महिला बचतगटातर्फे न्याहरी -भोजनाची उत्तम व्यवस्था आहे.

या सर्व धनसंपत्तीबरोबरच या अभयारण्यात नव्यानेच दाखल झालेले रानगवेसुद्धा आढळून आले आहेत. मोठ्या वजनी गटातील व मोठी शरीरयष्टी असलेले 14 रानगवे येथे आढळून आले आहेत. पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या रानगव्यांचा मात्र स्थानिक शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वावडुंगी, सुपेगाव, केळघर आदी भागांत त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. या रानगव्यांची भूक खूप मोठी असल्याने एखाद्या शेतात घुसल्यास त्या शेतातील धान्याचा अवघ्या काही तासांतच फडशा पाडून टाकतात. त्यामुळे स्थानिक शेतकरी दुखी झाले आहेत. आकाराने मोठे असल्याने ते माणसांवर धावून येतात.त्यामुळे शेतकरी या प्राण्यांपासून भयग्रस्त झाले आहेत. या रानगव्यांना पिटाळून लावण्यासाठी लोकांना जळत्या मशाली घेऊन जावे लागते आणि तेव्हाच ते दूरवर पळून जात असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे. या अभयारण्यात हळूहळू या रानगव्यांची संख्या वाढणार असून, याचा मोठा त्रास स्थानिक शेतकर्‍यांना भोगावा लागणार आहे. वन कर्मचार्‍यांची अपुरी गणसंख्या यामुळे या बलाढ्य अशा प्राण्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण बनले आहे.

फणसाड अभयारण्याचे  वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सांगितले की, रानगव्यांचा वाढता त्रास शेतकर्‍यांना बाधक ठरत आहे.आमच्याकडे स्थानिकांच्या तक्रारी आल्यानंतर आमचे कर्मचारी तातडीने यावर उपाययोजना करतात, तसेच शेतकर्‍यांच्या शेताच्या झालेल्या नुकसानीचेदेखील पंचनामे करीत असून, तातडीने भरपाई मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

-संजय करडे, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply