Breaking News

खर्चाच्या मर्यादेत राहण्यासाठी कसरत

उमेदवार दक्ष; 28 लाखांपर्यंतची मार्यादा

उरण ः रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत विधानसभा, लोकसभा निवडणुकीत  उमेदवाराने करावयाच्या खर्चाबाबत आयोगाने मर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वच उमेदवार खर्चाचा आकडा 28 लाख रुपयांच्या वर जाणार नाही, याची काळजी घेत आहे.

विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उमेदवाराला 28 लाखांची खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक प्रचार संपेपर्यंतच्या खर्चाचा रोजचा व प्रत्येक गोष्टीच्या खर्चाचा हिशेब निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांना द्यावा लागत आहे.

खर्चाची माहिती उमेदवाराचा प्रतिनिधीही सादर करू शकतो. त्यामध्ये सर्व खर्चाच्या तपशिलासह बँक स्टेटमेंट, बॅक रजिस्टर, कॅश रजिस्टर यासह सर्व प्रकारची बिलेही सादर करावी लागणार आहेत. याबतची सर्व माहिती सिडको गेस्ट हाऊस, किल्ले गावठाण येथे 10 ते 5 या वेळात खर्चाचा सर्व तपशील द्यावा लागणार आहे.

निवडणुकीच्या खर्चात प्रत्येक उमेदवाराचा प्रचारासाठी दिवसभरात होणार्‍या खर्चाची इत्यंभूत माहिती निवडणूक अधिकार्‍यांना द्यावी लागते. त्यात प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी, चारचाकी, मोठी वाहने यासह ध्वनिवर्धक, झेंडे आणि फलक याबाबतची माहिती द्यावी लागत असते.

संपूर्ण निवडणूक काळात आणि प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंतचा खर्च यात दिवसागणिक देणे बंधनकारक असते, तसेच उमेदवाराने दिलेल्या खर्चाची खातरजमा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेबाबतचे पथक याबाबत काम करते. उमेदवाराने खर्च कमी दाखवला, तरी आयोगामार्फत नेमण्यात आलेली भरारी पथके, चित्रीकरण पथक, तसेच विविध ठिकाणी असलेली नाकाबंदी पथके यांच्याद्वारे कोठेही आचारसंहितेचा भंग होत नाही ना याबाबत लक्ष ठेवून खर्चाचीही माहिती घेत असते. त्यामुळे नेहमीपेक्षा दरवेळेच्या नियमावलीत अधिक कठोर नियम करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. यात प्रत्येक उमेदवारावर आचारसंहिता पथकाचे आणि खर्चाची माहिती घेणार्‍या पथकाचे नियंत्रण असते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply