पनवेल ः रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शाळेतील 650 विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेऊन स्वतःच्या हाताने विज्ञान, तसेच गणित विषयासंबंधी प्रकल्प बनवले होते.
या प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना व बुद्धीचा विकास होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. या प्रदर्शनात आग, पाणी, वीज यासंबंधी, तसेच गणितमधील भागाकार, गुणाकार, अधिक, वजाबाकी जलद गतीने कशी सोडवावीत, गणिते सोडविण्याच्या सोप्या पद्धती यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी दाखविली. वेट मॉप, ड्राय मॉप एकाच वेळी वापरून साफसफाई करणारी नवीन तंत्रज्ञानाची मशीन तयार करून त्याची प्रात्यक्षिके मुलानी दाखविली. त्यांनी 150च्यावर गणिताचे, व 200च्यावर विज्ञानाचे प्रकल्प सादर केले. त्यांना विज्ञान, तसेच गणित विषयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण इस्त्रो चांद्रयान प्रतिकृती हे होते. ही प्रतिकृती चित्रकलेच्या सहाय्यक शिक्षकांनी बनविली होती.
चांद्रयान बनविण्यास शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.