Breaking News

कोविडमुळे कर्नाळा अभयारण्य बंद ; पर्यटकांत नाराजी, स्थानिकांच्या रोजगारांवर येणार गदा

पनवेल : वार्ताहर

कोविडच्या तिसर्‍या लाटेला सुरुवात झाल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यातच पनवेलमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे कर्नाळा अभयारण्यही पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अभयारण्य प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या स्थानिक रोजगार व बचत गटातील महिलांच्या रोजगारावर गदा येणार आहे. पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भाग तसेच पनवेल शहरात सध्याच्या घडीला 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्यात आल्याने काही पर्यटकांचा हिरमोड झाली आहे. एकीकडे मॉल तसेच हॉटेल 50 टक्के उपस्थितीत सुरू असताना नैसर्गिक पर्यटन मात्र बंद ठेवण्यात आले आहे. कर्नाळा अभयारण्यात दररोज किमान 300 पर्यटक येत असतात. सुटीच्या दिवशी ही संख्या 500च्या वर जाते. या पर्यटकांमुळे स्थानिक बचत गटांना रोजगार मिळतो, मात्र ते बंद होणार असल्याने बचत गटातील महिलांच्या रोजगारावरही गदा येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या 12 किलोमीटरवर हे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा परिसर राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. कर्नाळा अभयारण्यात 642 वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मिळ वनस्पती आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply